ट्रॅक्टर विक्रीच्या आमिषाने लाखोंची फसवणूक; दोन ट्रॅक्टरसह आरोपी जेरबंद

राहुरी वेब प्रतिनिधी शरद पाचारणे : ट्रॅक्टर विकून देण्याचे आमिष दाखवत लाखो रुपयांची फसवणूक करणाऱ्या आरोपीला राहुरी पोलिसांनी अटक केली असून त्याच्याकडून तब्बल 36 लाख रुपये किमतीचे दोन ट्रॅक्टर जप्त करण्यात आले आहेत.याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राहुरी पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्यात फिर्यादी जावेद जाकीर शेख व साक्षीदार नितीन भाऊसाहेब कदम यांना आरोपी चंद्रकांत तुकाराम लोंढे (रा. लोंढेवाडी, ता. नेवासा) व चंद्रभान गोविंद शेंडगे यांनी ट्रॅक्टर विकून देण्याचे आश्वासन दिले होते. त्यासाठी दोघांकडून अनुक्रमे तीन लाख व दोन लाख रुपये स्वीकारले. मात्र ट्रॅक्टर न देता फसवणूक केल्याप्रकरणी राहुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्हा दाखल झाल्यानंतर आरोपी फरार झाला होता.

पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन, अपर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाकचौरे आणि उपविभागीय पोलीस अधिकारी जयदत्त भवर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या पथकाने आरोपीचा शोध सुरू केला. पोलीस कर्मचारी अर्जुन दारकुंडे, प्रमोद ढाकणे व भाऊसाहेब शिरसाठ यांनी लोंढेवाडी येथे सापळा रचून आरोपीला ताब्यात घेतले.

अटकेनंतर आरोपीकडून हिरव्या रंगाचे दोन जॉन डिअर कंपनीचे ट्रॅक्टर जप्त करण्यात आले. या दोन्ही ट्रॅक्टरांची एकूण किंमत सुमारे 36 लाख रुपये असल्याचे पोलिसांनी सांगितले.

दरम्यान, आरोपीने आणखी कोणाला ट्रॅक्टर विक्रीचे आमिष दाखवून फसवणूक केली असल्यास संबंधितांनी तातडीने राहुरी पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा, असे आवाहन पोलिसांनी केले आहे. तसेच अशा प्रलोभनांना बळी पडू नये, असेही पोलिसांनी नागरिकांना आवाहन केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *