राहुरी वेब प्रतिनिधी शरद पाचारणे : महात्मा फुले कृषी विद्यापीठ अंतर्गत कृषी महाविद्यालय, पुणे येथील देशी गाय संशोधन व प्रशिक्षण केंद्राचे ‘अजितदादा पवार देशी गाय संशोधन व प्रशिक्षण केंद्र’ असे नामकरण करण्यास राज्य शासनाने मान्यता दिली आहे. याबाबतचा शासननिर्णय कृषी विभागाने जारी केला आहे.दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या संकल्पनेतून या नाविन्यपूर्ण केंद्राची स्थापना करण्यात आली होती. देशी गायींच्या दुर्मिळ व मौल्यवान प्रजातींचे संवर्धन, दुग्धक्षमता वाढविणे तसेच शाश्वत शेतीसाठी शेतकऱ्यांना मार्गदर्शन करणे या उद्देशाने केंद्र कार्यरत आहे.कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी सांगितले की, अजितदादा पवार यांच्या कृषी व पशुसंवर्धन क्षेत्रातील योगदानाची दखल घेत त्यांच्या स्मृती जतन करण्याच्या हेतूने केंद्रास त्यांचे नाव देण्यात आले आहे. या निर्णयामुळे देशी गोवंश संवर्धनाच्या कार्याला अधिक बळ मिळणार असल्याचा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.