ऑपरेशन मुस्कान अंतर्गत अल्पवयीन मुलीची सुटका

राहुरी वेब प्रतिनिधी शरद पाचारणे : तालुक्यातील एका १७ वर्षीय अल्पवयीन मुलीच्या अपहरणप्रकरणी राहुरी पोलिसांनी वेगाने तपास करत मुलीचा शोध घेऊन तिची सुखरूप सुटका केली. तसेच आरोपीला अटक करून मुलीस पालकांच्या ताब्यात देण्यात आले.
याबाबत माहिती अशी की, तालुक्यातील १६ वर्षे ७ महिने वयाची अल्पवयीन मुलगी ३० एप्रिल रोजी रात्री साडेआठच्या सुमारास घरातून कोणालाही न सांगता निघून गेली होती. ती परत न आल्याने पालकांनी राहुरी पोलिस ठाण्यात अज्ञात आरोपीविरोधात अपहरणाचा गुन्हा दाखल केला होता.
या प्रकरणाचा तपास सुरू असताना पोलिस निरीक्षक संजय ठेंगे यांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार सचिन दिलीप शिंदे (वय २८) यास ११ मे रोजी अटक करण्यात आली. चौकशीत त्याने मित्राच्या मदतीने संबंधित मुलीला लग्नासाठी पळवून नेल्याची कबुली दिली.
दरम्यान, मुलगी आश्वी पोलिस हद्दीत असल्याची माहिती पोहेकॉ राजू पुंड यांना मिळाल्यानंतर तपास पथकाने तत्काळ कारवाई करत बुधवारी (दि.१३) मुलीचा शोध घेत तिला राहुरी पोलिस ठाण्यात आणले. त्यानंतर मुलीस पालकांच्या ताब्यात देण्यात आले.
ही कारवाई पोलिस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या नेतृत्वाखाली पोहेकॉ राजू पुंड, रामनाथ सानप, गणेश मैड, सचिन धनाड, दरेकर व पोना वेताळ यांनी केली.
ऑपरेशन मुस्कान अभियानांतर्गत राहुरी पोलिसांनी आतापर्यंत तब्बल १०९ मुलींचा शोध घेऊन त्यांना पालकांच्या ताब्यात दिल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *