श्रीरामपूर दिनांक १३ ऑगस्ट २६ : उत्तर अहिल्यानगर विभागात गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी अपर पोलिस अधीक्षक सोमनाथ वाकचौरे यांच्या नेतृत्वाखाली काल दिवसभर व्यापक ‘ऑल आऊट ऑपरेशन’ राबविण्यात आले. या मोहिमेत उत्तर विभागातील विविध पोलिस ठाण्यांच्या हद्दीत १२० हून अधिक आरोपींना अटक करण्यात आली. फरार आरोपींचा शोध, अजामीनपात्र व जामीनपात्र वॉरंटची बजावणी, अवैध शस्त्रे, गांजा, दारू, मटका-जुगार तसेच चोरीच्या वाहनांच्या व्यवहारांवर कारवाई करण्यात आली.
या कारवाईत पोलिस अधीक्षक मुम्मका सुदर्शन, अपर पोलिस अधीक्षक सोमनाथ वाकचौरे, श्रीरामपूर उपविभागीय पोलिस अधिकारी जयदत्त भवर, तसेच संबंधित पोलिस ठाण्यांचे अधिकारी व अंमलदार सहभागी झाले.
श्रीरामपूर विभागातील १७ पोलिस ठाण्यांच्या हद्दीत एकाचवेळी ही कारवाई करण्यात आली. कोपरगाव, राहुरी, श्रीरामपूर, नेवासा, शिर्डी, लोणी, अकोले आदी परिसरात सराईत व फरार आरोपींचा शोध घेण्यात आला.
दोन प्रकरणांत तलवारी जप्त
कोपरगाव तालुका पोलिस ठाण्याच्या हद्दीत प्राणघातक हल्ल्याच्या गुन्ह्यातील आरोपीकडून धारदार लोखंडी तलवार जप्त करण्यात आली. तसेच राहुरी पोलिस ठाण्याच्या हद्दीतही सराईत गुन्हेगाराकडून तलवार जप्त करण्यात आली. दोन्ही प्रकरणांत शस्त्र कायद्यान्वये गुन्हे दाखल करण्यात आले.
चार किलो गांजा जप्त
श्रीरामपूर शहर पोलिस ठाण्याच्या हद्दीत उपाध्ये मळा परिसरात पोलिसांनी कारवाई करत विक्रीच्या उद्देशाने ठेवलेला सुमारे चार किलो गांजा व एक कार असा सुमारे ४ लाख ६० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. या प्रकरणी अमली पदार्थ प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला.
अवैध दारू, जुगारावरही कारवाई
ऑल आऊट ऑपरेशनमध्ये अवैध दारूची निर्मिती, विक्री व वाहतूक करणाऱ्यांविरुद्ध ४० गुन्हे दाखल करण्यात आले. तसेच अवैध मटका-जुगार खेळविणाऱ्यांविरुद्ध १८ गुन्हे दाखल करून मुद्देमाल जप्त करण्यात आला.
भंगार दुकानांवर छापे
वाहन चोरीच्या घटनांच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी श्रीरामपूर शहरातील भंगार दुकानांची बारकाईने तपासणी केली. यारा टायर्स, सुतारगिरणी फाटा तसेच डी.एम. टायर्स अँड गॅरेज, रेल्वे फाटकाजवळ या ठिकाणी तपासणी करण्यात आली. काही ठिकाणी वाहनांचे इंजिन, टायर्स, दरवाजे, काचा व अन्य सुटे भाग आढळून आले. वाहनांच्या मालकीबाबत समाधानकारक कागदपत्रे सादर न झाल्याने संबंधितांवर कारवाई करण्यात आली.
१०० अजामीनपात्र वॉरंटची बजावणी
ऑपरेशनदरम्यान न्यायालयाकडून जारी करण्यात आलेल्या १०० अजामीनपात्र वॉरंटची बजावणी करून आरोपींना अटक करण्यात आली. तसेच १४६ जामीनपात्र वॉरंटची बजावणी करण्यात आली. न्यायालयातील प्रलंबित विविध प्रकरणांमध्ये ३३८ समन्सची बजावणी करण्यात आली.
वाहतूक नियमभंगालाही दणका
बेदरकार वाहन चालविणे, फॅन्सी नंबर प्लेट, ब्लॅक फिल्म, सीट बेल्ट न वापरणे आदी नियमभंग करणाऱ्यांविरुद्ध ३३२ मोटार वाहन कायद्यांतर्गत कारवाया करण्यात आल्या. त्यातून २ लाख ५ हजार ४०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. दारू पिऊन वाहन चालविणाऱ्यांविरुद्धही कारवाई करण्यात आली.
ही कारवाई पोलिस अधीक्षक मुम्मका सुदर्शन, अपर पोलिस अधीक्षक सोमनाथ वाकचौरे, उपविभागीय पोलिस अधिकारी जयदत्त भवर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. तसेच पोलिस निरीक्षक विशाल खैरे, सहाय्यक पोलिस निरीक्षक वेतन लोखंडे, रामचंद्र शिंदे, रोशन निकम, पोलिस उपनिरीक्षक आप्पासाहेब हेंडाळ, उमेश चव्हाण, शीतल मुंडे तसेच श्रीरामपूर विभागातील विविध पोलिस ठाण्यांचे अधिकारी व अंमलदार यांनी कारवाईत सहभाग घेतला.
एकाच दिवसात १२० हून अधिक आरोपींना अटक झाल्याने उत्तर अहिल्यानगरातील गुन्हेगारी प्रवृत्तींना पोलिसांनी चांगलाच दणका दिला आहे.