महिलेच्या खून प्रकरणी आरोपीला जन्मठेप; पोलिस निरीक्षक नंदकुमार दुधाळ यांच्या तपासाला यश

शिर्डी : विवाहित महिलेसोबत अनैतिक संबंध ठेवून तिचा निर्घृण खून करणाऱ्या आरोपीस राहता येथील जिल्हा व सत्र न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. विशेष म्हणजे या गुन्ह्यात कोणताही प्रत्यक्षदर्शी साक्षीदार नसतानाही पोलिस निरीक्षक नंदकुमार दुधाळ यांनी परिस्थितीजन्य पुरावे भक्कमपणे गोळा करून न्यायालयात सक्षमपणे मांडल्याने आरोपीला शिक्षा सुनावण्यात आली.दि. १६ जुलै २०२३ रोजी राहता तालुक्यातील सावळीविहीर येथील आरोपी अजय राजेंद्र म्हस्के याचे विवाहित महिला सौ. सविता सुनील बत्तिसे हिच्यासोबत अनैतिक संबंध होते. गेल्या काही वर्षांपासून दोघे एकत्र राहत होते. आरोपी दुसरे लग्न करणार असल्याच्या कारणावरून दोघांमध्ये वारंवार वाद होत होते. याच रागातून आरोपीने सविता हिच्यावर धारदार चाकूने गळ्यावर वार करून तिचा खून केला होता.या प्रकरणी शिर्डी पोलिस ठाण्यात भादंवि कलम ३०२ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. आरोपीला तत्काळ अटक करण्यात आली. सदर गुन्ह्याचा तपास तत्कालीन पोलिस निरीक्षक नंदकुमार दुधाळ यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आला. तपासादरम्यान कोणताही प्रत्यक्षदर्शी साक्षीदार उपलब्ध नसतानाही त्यांनी परिस्थितीजन्य पुरावे, तांत्रिक माहिती, साक्षीदारांचे जबाब व घटनास्थळावरील पुरावे यांची साखळी मजबूत केली. न्यायालयात सादर करण्यात आलेल्या पुराव्यांच्या आधारे आरोपीविरुद्धचा गुन्हा सिद्ध करण्यात यश आले.या तपासात पोलिस निरीक्षक सोपान शिरसाठ, सहाय्यक पोलिस निरीक्षक संभाजी पाटील, पोहेकॉ संदीप गडाख व पोलिस कर्मचारी कैलास राठोड यांनीही महत्त्वाची भूमिका बजावली.सदर खटल्याची सुनावणी राहता येथील जिल्हा व सत्र न्यायालयात झाली. न्यायाधीश राजेश एस. गुप्ता यांनी आरोपी अजय राजेंद्र म्हस्के यास दोषी ठरवत जन्मठेप व १० हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली.या खटल्यात सरकारी पक्षाच्या वतीने अ‍ॅड. डी. जी. पानगव्हाणे यांनी काम पाहिले. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *