३२ वर्षांची साईसच्चरित्र पारायणाची अखंड परंपरा; डॉ. सुजय विखे पाटील यांची भेट

शिर्डी : श्रद्धा आणि सबुरीचा संदेश देणाऱ्या श्री साईबाबांच्या पावन भूमीत गेल्या ३२ वर्षांपासून अखंड सुरू असलेल्या श्री साई सच्चरित्र पारायण सोहळ्यास यंदाही भाविकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. भाजपा प्रदेश उपाध्यक्ष डॉ. सुजय विखे पाटील यांनी पारायण सोहळ्यास भेट देऊन साईचरित्राचे श्रवण केले. यावेळी विखे पाटील परिवाराच्या वतीने भाविकांना शुभेच्छा देण्यात आल्या.

श्री साईबाबा संस्थान विश्वस्त व्यवस्था, शिर्डी नाट्य रसिक मंच आणि शिर्डी ग्रामस्थ यांच्या संयुक्त विद्यमाने या पारायण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. तीन दशकांहून अधिक काळ अखंड सुरू असलेली ही आध्यात्मिक परंपरा शिर्डीच्या धार्मिक आणि सांस्कृतिक जीवनाचा अविभाज्य भाग बनली आहे. शिर्डी, पंचक्रोशी, राहाता तालुक्यासह महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांतून मोठ्या संख्येने माता-भगिनी आणि साईभक्त सोहळ्यात सहभागी झाले आहेत.

श्रद्धा, सबुरी, संस्कार आणि सामाजिक एकोप्याची परंपरा जपणारा हा सोहळा आहे. साईबाबांच्या पावन भूमीत मोठ्या संख्येने माता-भगिनी आणि भाविक सहभागी होत आहेत, ही आनंदाची व अभिमानाची बाब आहे. साईबाबांच्या आशीर्वादाने शिर्डी परिसरात आनंददायी, सुरक्षित आणि सकारात्मक वातावरण निर्माण करण्यासाठी सदैव प्रयत्नशील राहू, असे डॉ. सुजय विखे पाटील यांनी सांगितले.

विखे पाटील परिवाराच्या वतीने दरवर्षी महिलांसाठी विविध धार्मिक आणि सांस्कृतिक उपक्रमांचे आयोजन केले जाते. मागील वर्षी शिवमहापुराण कथेचे आयोजन करण्यात आले होते. यंदाही महिलांसाठी धार्मिक अथवा सांस्कृतिक स्वरूपाचा विशेष कार्यक्रम आयोजित करण्याची ग्वाही डॉ. विखे पाटील यांनी यावेळी दिली.

यावेळी विखे पाटील परिवाराच्या वतीने साईकार्यासाठी एक लाख रुपयांचे योगदान देण्यात आले. तसेच ग्रामस्थांसमवेत अल्पोपहाराचा आस्वाद घेत डॉ. विखे पाटील यांनी उपस्थित भाविकांशी संवाद साधला. साईबाबांच्या कृपेने सर्वांचे जीवन सुखी, समृद्ध, निरोगी आणि आनंदमय व्हावे, अशी प्रार्थनाही यावेळी करण्यात आली.

याप्रसंगी भाविक, माता-भगिनी, ग्रामस्थ, नगरसेवक तसेच विविध क्षेत्रांतील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *